गाठ कोरोनाशी लढा मृत्यूशी
*गाठ कोरोनाशी लढा मृत्यूशी* *✍🏻श्री विनोद खटके✍🏻* 9423859438
आज बरोबर 1 वर्षांपूर्वी मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत बाहेर पडलो.कुटुंबाची खिळखिळी झालेली इमारत नव्या दमाने पुन्हा बांधली . मरण खूप भेसूर असतं पण मरणाला स्पर्श करून आल्यावर जगणं किती सुंदर आहे याची प्रचिती पूर्वीपेक्षा अधिक येते.या काळात धैर्याची,संयमाची परकाष्ठा करावी लागते,आपलं असणं आणि नसणं याची सीमारेषा अधिक स्पष्ट जाणवू लागते.मनाचा तोल ढासळवणाऱ्या भीतीला जिवाच्या आकांताने पायाखाली घ्यावे लागते.आताशी सूर्य मध्यावर आहे इतक्यात मावळणे मंजूर नाही म्हणून सर्वशक्तीनिशी अशक्त मुठींमध्ये बळ बांधावं लागतं.अंगात जागोजाग उठणाऱ्या वेदनेला आसरा न देता तिला झिडकारून खायला उठणाऱ्या समोरच्या भिंतीवर आपटावं लागतं. वेगानं धडधडणाऱ्या काळजाला संयमाचे धडे द्यावे लागतात तर मलूल आणि त्राण गाळलेल्या देहाला कडाडणाऱ्या चपळ विजेचा परिचय करून द्यावा लागतो. लहान निरागस लेकरू आणि साठीकडे झुकलेली कोरोनाग्रस्त आई जेव्हा काकुळतीने आणि सैरभैर होऊन निःशब्दपणे आपण बरे होऊ का ? असा डोळ्यांनीच उत्तर माहीत नसलेला प्रश्न विचारतात तेव्हा मोठ्या हिमतीने आवंढा गिळावा लागतो आणि अश्रू डोळ्याच्या बाहेर पडणार नाहीत यासाठी शिकस्त करावी लागते. युद्धात बलाढ्य शत्रूसोबत लढताना शूरत्व जेवढं पणाला लागत नाही तेवढं हळव्या मनाला आवरताना पणाला लागतं हेचं खरं. किती जगलो? आणि किती जगायचं राहिलं ? असा प्रश्न एरव्ही कधी तीव्रतेने जाणवत नाही तो जाणवतो तो मृत्यूचा इरादा कळाल्यावर.एकदा इरादा समजला की, मग मिळू लागतात उत्तरं की, नजरेच्या टप्प्यातून रोजच्या जगण्याच्या रहाटगाडग्यात निसटलेल्या कितीतरी गोष्टी डोळे भरून पुन्हा पहायच्या आहेत म्हणून . नकळत दुखावलेल्या कित्येकांना सॉरी म्हणायचं राहिलं आहे म्हणून. वेळप्रसंगी हातातलं काम टाकून पळणाऱ्या आपल्या माणसांच्या वेळेला धावायचं बाकी आहे म्हणून . राहिलेली सारी अर्धवट कामं पूर्ण करूनच जगण्याला शांत ,समाधानाने आणि आत्मतृप्तीच्या आनंदाने निरोप द्यायचा आहे असं प्रत्येक क्षणाला मनाला कधी ठणकावून तर कधी हळूवार समजुतीने सांगत सांगतच उदात्त हेतूने स्वार्थी होऊन बाहेर पडलो. जगण्या मरण्याच्या या संघर्षात काहीतरी गमावलं पण खूप काही कमावलंही. जग जिंकण्याची भाषा करणाऱ्या मनाच्या क्षमतेच्या मर्यादा समजल्या,आपल्यावर वरवर प्रेम करणाऱ्या लोकांचे बेगडी मुखवटे गळून पडले,ज्यांच्या हृदयातून सच्च्या प्रेमाचे झरे वाहतात त्यांचे चेहरे अधिक उजळून निघाले. आधाराचे शब्द काय किमया करू शकतात आणि त्यांचं मूल्य किती याचा हिशोब न केलेलाच बरा. दवा आणि दुवा यांचं आयुष्यातील स्थान आणि परमेश्वराची अदृश्यशक्ती किती महत्वाची आहे हे समजलं.दवा आणि दुवा देणाऱ्या प्रत्येकाचे आणि जगताना सतत सावलीसारखं पाठीशी असणाऱ्या परमेश्वराचे ऋण आभाळाएवढे आहे. सर्वांच्या ऋणात राहणे हीच कृतज्ञता. *थँक्स कोरोना थँक्स जीवलगांनो* 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खूपच छान
ReplyDeleteखुपच ह्रदयस्पर्शी सर 👌🏻👍🏻
ReplyDeleteखूप छान शब्दांकन विनोद ....
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteखूपच छान अगदी मार्मिक आणि हृदस्पर्शी लेखन 👌👌👌
ReplyDeleteछान!👌
ReplyDeleteखूप सुंदर आणि खरे आहे खरंच हे अनुभव खूप काही शिकवून जातात आणि जगण्याचा एक मार्ग दाखवतात
ReplyDeleteखूप छान, मरणाला स्पर्श करून आल्यानंतर जगण्याची किंमत अगदी खऱ्या अर्थाने समोर आणली.शब्दांकन खूप सुंदर.👌👌
ReplyDeleteThanks
Deleteसर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद
ReplyDeleteमना सज्ज ना भक्ती पंथेचि जावे
ReplyDelete