Posts

Showing posts from 2020

लावणी: थंडीचा महिना -विनोद खटके

 लावणी: थंडीचा महिना गार गार थंडीचा महिना गार गार थंडीचा महिना  आता जीव माझा दमच खाईना खोटं काळजाला कुठंवर सांगू माझा साजन अजून येईना.  ||धृ|| हिचा साजन अजून येईना गं----कोरस हिला उबदार मिठीत घेईना-----कोरस ही माघाची थंडी विषारी करी जीवाची तगमग भारी मूठ झाकली सव्वा लाखाची चारचौघात सांगायची चोरी अंगाअंगात भिनल्या विषाचा तुझ्याबिगर उतारा होईना माझा साजन अजून येईना  ||१||  हिचा साजन अजून येईना गं ----कोरस हिला उबदार मिठीत घेईना.----कोरस एका नजरेत पाडुनी भूल या कळीचं केलंस फूल दोन मनाचे जोड किनारे सख्या होऊनी आता तू पूल वाट पाहू मी किती रं राघू झुरतेय तुझ्यासाठी मैना. माझा साजन अजून येईना  ||२|| हिचा साजन अजून येईना गं ----कोरस हिला उबदार मिठीत घेईना.-----कोरस तुझ्या स्पर्शाने पेटू दे अंग गाली प्रीतीचा तुझ्याच  रंग आता सोडून जीवाची पर्वा  तू दिवा मी झाले पतंग डोळा मिटेना पहाट झाली जड पापणी माघार घेईना. माझा साजन अजून येईना. ||३|| हीचा साजन अजून येईना गं----कोरस हिला उबदार मिठीत घेईना.-----कोरस        कवी:विनोद खटके     ...

मन कल्लोळ कल्लोळ

मन कल्लोळ कल्लोळ जणू सावळा गोंधळ. कधी निर्मळ निर्मळ एका क्षणात गढूळ. खोल  आठवणी किती जाते खोदत खोदत. नाही पंख त्याला तरी कसे जाते रे उडत. त्याचे हासणे रडणे क्षणाक्षणाला चालते. उभा राहुनी समोर रोज स्वतःला बोलते. त्याला हजारात पाय नाही कसलाच मेळ. भल्याभल्यांना कळेना त्याचा करामती खेळ. घेते रूपे कितीतरी त्याचा तळच घावेना. असा कसा रे आकार ते कशात मावेना. हात टेकले साऱ्यांनी असे अवघड हे कोडे. वाट सोडुनी उधळे जणू बेलगाम घोडे. साऱ्या मोहाचं हे मुळं करी शहाण्याला खुळं. ज्यानं जिंकलं तयाला त्याची उद्घारली कुळं. मन कल्लोळ कल्लोळ  जणू सावळा गोंधळ कधी निर्मळ निर्मळ एका क्षणात गढूळ. कवी: विनोद खटके 9423859438

लावणी-घायाळ ही हरणी

  असा काळजात लागलाय बाण गं वटल्या झाडाला फ़ुटलया पान गं काय केली अशी करणी सख्या घायाळ मी हरणी ||धृ|| केली घायाळ ही हरणी--कोरस केली घायाळ ही हरणी--कोरस साऱ्या देहाची केली पौर्णिमा तुझ्या प्रीतीची भलतीच नशा बंद ओठांनं कशी साजना जगावेगळी मी बोलतेय भाषा. उलघाल चातकाची तशी  राया व्याकुळ मी धरणी झाली घायाळ ही हरणी ||धृ|| केली घायाळ ही हरणी--कोरस केली घायाळ ही हरणी--कोरस डोळा डोळ्याला भिडण्याचा गुन्हा करी वेड्यागत जीव पुन्हा पुन्हा रात विरहाची जाळतेया कशी जणू छळतोया रोग बाई जुना. रान वाफशाला आलं आता कोऱ्या दिलावर कर पेरणी झाली घायाळ ही हरणी.||2|| केली घायाळ ही हरणी -- कोरस केली घायाळ ही हरणी.--कोरस आली श्वासाला मोगऱ्याची धुंदी बघ ओझ्यानं वाकलीया फांदी धीर धरून कुठवर जगू  जीव झालाय पुरा जायबंदी. सारी तळमळ आतून  राया..नाही खोटी वरकरणी. झाली घायाळ ही हरणी ||3|| केली घायाळ ही हरणी--कोरस केली घायाळ ही हरणी--कोरस असा काळजात लागलाय बाण गं वटल्या झाडाला फ़ुटलया पान गं काय केली अशी करणी सख्या घायाळ मी हरणी ||धृ|| केली घायाळ ही हरणी-- कोरस केली घायाळ ही हरणी--कोरस कवी:विनोद खटके 942385...

बहावा

Image