मन कल्लोळ कल्लोळ
मन कल्लोळ कल्लोळ जणू सावळा गोंधळ. कधी निर्मळ निर्मळ एका क्षणात गढूळ. खोल आठवणी किती जाते खोदत खोदत. नाही पंख त्याला तरी कसे जाते रे उडत. त्याचे हासणे रडणे क्षणाक्षणाला चालते. उभा राहुनी समोर रोज स्वतःला बोलते. त्याला हजारात पाय नाही कसलाच मेळ. भल्याभल्यांना कळेना त्याचा करामती खेळ. घेते रूपे कितीतरी त्याचा तळच घावेना. असा कसा रे आकार ते कशात मावेना. हात टेकले साऱ्यांनी असे अवघड हे कोडे. वाट सोडुनी उधळे जणू बेलगाम घोडे. साऱ्या मोहाचं हे मुळं करी शहाण्याला खुळं. ज्यानं जिंकलं तयाला त्याची उद्घारली कुळं. मन कल्लोळ कल्लोळ जणू सावळा गोंधळ कधी निर्मळ निर्मळ एका क्षणात गढूळ. कवी: विनोद खटके 9423859438